'... हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया।’
- Aarti Manjarekar
- Jul 11, 2021
- 3 min read
Updated: Mar 1
मैं ज़िन्दगी का साथ निभाता चला गया
हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया
बरबादियों का सोग़ मनाना फ़िज़ूल था
बरबादियों का जश्न मनाता चला गया
जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया
जो खो गया मैं उस को भुलाता चला गया
गम और खुशी में फ़र्क़ ना महसूस हो जहाँ
मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया
पाच ते सहा दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतरही ज्यांची लोकप्रियता तसुभरही कमी झाली नाही अशा असंख्य गाण्यांपैकी एक ... माझं अत्यंत आवडतं गाणं... 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया।' साहिर लुधियानवी यांच्या प्रतिभाशाली लेखणीतून अवतरलेले हे गीत , औदासिन्याने झाकोळून गेलेल्या एखाद्या मनाला उभारी देऊन पुन्हा जोमाने जीवनाला सामोरे जाण्याची ताकद नक्की देऊ शकते.
१९६० च्या दशकातील देव आनंदच्या ‘चॉकलेट हीरो’ प्रतिमेने सर्वांच्या मनाला भुरळ तर घातलीच होती ... विशेषतः तरुणींच्या ! तसंच रफीचा स्वर्गीय स्वर आणि जयदेव यांचे कर्णमधुर संगीत हे जसे या गाण्याच्या यशाचे भागीदार आहेत तसेच किंबहुना त्यापेक्षा काकणभर अधिकच श्रेय जातं ते साहिर लुधियानवी यांच्या नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेतून अवतरलेल्या ह्या गीताच्या शब्दांना ! हे सारे लेखक, कवी, गीतकार कधीकधी संत, तत्त्वज्ञच अधिक वाटतात. किती मोजक्या शब्दात जीवनाचं सत्य सांगून टाकतात ... तुमच्याआमच्यासाठी !
'... हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया।’
वरकरणी साधी सोपी वाटणारी ही गोष्ट खरंच आत्मसात करायला किती अवघड ! पण ज्याला हे साध्य झाले त्याला आनंदनिधानच गवसला ! समर्थ म्हणतात , ’जगी सर्व सुखी असा कोण आहे। विचारी मना तूचि शोधूनि पाहे॥’ तुकोबा सांगतात, ‘सुख पाहता जवा एवढे, दु:ख पर्वताएवढे’. अगदी आपले गदिमासुध्दा आपल्याला उमगलेले सत्य सांगून सजग करतात, ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे...’ म्हणजे दु:ख हे कोणाही भूतमात्रास चुकले नाही हे निश्चित ! असं असताना आपण सुख तेवढं गृहीत धरून चालतो आणि दु:ख, संकटे आपल्याला विदीर्ण करून टाकतात. असं का बरं व्हावं ? ‘जो खो गया’ त्याचं दु:ख, ‘जो मिल गया’ च्या सुखापेक्षा मोठं का असावं ?
“जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया
जो खो गया मैं उस को भुलाता चला गया”
ह्याचा एखादवेळेस चुकीचा अर्थ लावला जाण्याची शक्यता आहे. ह्यात दैववाद आहे की काय असं वरकरणी वाटू शकतं. ‘ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असो द्यावे समाधान’ ह्या पंक्तीचाही असाच काही वेळेस अनर्थ केला जातो. वस्तुतः ह्या दोन्हीतील मध्यवर्ती कल्पना एकच आहे असं मला वाटतं. इथे निष्क्रीयता सांगितली नाही. प्राप्त परिस्थितीचा स्वीकार हे काही दुर्बल निष्क्रीयतेचे लक्षण नाही. ते संयम आणि धृतीचेच एक प्रतिरूप नाही का ?
लुधियानवी एवढं सांगून थांबत नाहीत. आणखी एक पाऊल पुढे जाऊन ते म्हणतात, ‘बरबादियों का जश्न मनाता चला गया’ ... कारण त्याचं दुःख करत बसणं निरर्थक होतं! म्हणजे नुसतं दुःख ‘बाळगणे’ सोडा एवढंच नाही तर ते ‘साजरं’ करा ?! कोणत्या मातीची बनली असतील ही माणसं ?! मला ती रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेली आणि नंतर prosthetic legs च्या सहाय्याने हिमशिखर सर करणारी अरुणिमा सिन्हा आठवली ! रात्रभर त्या जखमी, वेदनामय, घृणास्पद अवस्थेत असहाय्यपणे रेल्वेच्या ट्रॅकवर पडून राहिली असताना तिचं मनोबल खचून नसेल का गेलं ? जगण्याची उमेद संपून नसेल का गेली ? ... पुढे केव्हातरी एका भाषणात तिला सांगताना ऐकलं की दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या पडल्या मी विचार केला ... ज्याअर्थी मी या भयंकर जीवघेण्या प्रसंगातून वाचले त्याअर्थी यात काही परमेश्वरी संकेत खचितच असला पाहिजे. यात तिचं श्रेय हे की तिने तो परमेश्वरी संकेत ओळखला. एक ध्येय ठरवलं आणि ते प्रचंड हिमतीने आणि अथक परिश्रमाने गाठून दाखवलं ! हेलन केलर ... काय होतं तिच्याकडे ? एक विकलांग शरीर का एक अव्यंग कणखर मन ?! नियतीने पदरात घातलेला नकार नुसता स्वीकारला नाही तर त्याचं सकारात्मकतेत रुपांतर करून ते आव्हान प्रचंड ताकतीने पेलून धरलं ! यश त्यांच्या पदरात पडलं नसतं तरच नवल ! विधाताही ओशाळला असेल त्यांचं हे कर्तृत्व पाहून ! हाच का तो ‘बरबादी का जश्न’ ?!
ही तर फारच असामान्य घटना झाली पण तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्यांच्या आयुष्यांत असे कितीतरी दुःखाचे क्षण येतात की ज्यांना जवळ बाळगत बसण्यापेक्षा ‘धुएँ में उड़ाना’च श्रेयस्कर ठरावे. पुलंनी एका लेखात लिहिलं आहे , ... ”उद्या मला जेवायला मिळणार आहे किंवा नाही आणि आज रात्री झोपायला जागा सापडणार की नाही, ह्या चिंता घेऊन ज्या देशात लाखो लोक जगताहेत, तिथे माझ्यासारख्याने वैयक्तिक दुःख हा शब्दही उच्चारू नये, ह्या जाणिवेने मी कसलेही वैयक्तिक दुःख माझ्याभोवती रेंगाळू देत नाही.” किती ही परिपक्वता विचारांची !!!
साहिरजींनी शेवटच्या कडव्यात तर कमालच केली आहे.
“गम और ख़ुशी में फ़र्क ना महसूस हो जहाँ
मैं दिल को उस मक़ाम पे लाता चला गया”
सुख दुःखाच्या गोष्टी करून झाल्यावर ते म्हणतात की अंतिम पायरीवर मी माझ्या मनाला अशा उंचीवर घेऊन गेलो की जिथे मला सुख-दुःखातला फरकच जाणवेनासा झाला. हीच ती सुख-दुःखात समतोल साधण्याची परिसीमा ! हीच ती आध्यात्मात सांगितलेली उन्मनी अवस्था ! हेच ते ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलेले ‘चित्ताचे समत्व’ ! हेच ते भगवद्गीता वर्णित स्थितप्रज्ञाचे लक्षण ....
दुःखात ‘अनुद्विग्नमन’ (ज्याचे मन उद्विग्न होत नाही) , सुखात ‘विगतस्पृह’ (सुखाच्या ठायी ज्याला स्पृहा नाही) ‘वीतरागभयक्रोध’ (ज्याचे आसक्ती, भय आणि क्रोध नष्ट झाले आहेत)
‘स्थितधी’ (ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे)
ह्या उन्नत अवस्थेप्रत मनाला घेऊन जाणे ... हेच अभिप्रेत असेल का साहिरजींना ह्या गीतातून ?!
आरती मांजरेकर
२५ जुलै २०१८
Comments