स्नो व्हाईट आणि तीन ‘मोठे’ !
- Aarti Manjarekar
- Jul 11, 2021
- 5 min read
Updated: Sep 10, 2023

५ फेब्रुवारी २०१८ ! पार्थ, माझा मोठा मुलगा, १२वीच्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत होता. रात्रीच्या जेवणानंतर अभ्यासाला बसण्यापूर्वी तो समोरच्या शिवाजी पार्कात फिरायला जात असे. तसाच त्यादिवशीही गेला होता. धक्क्यावर बसल्या बसल्या त्याचं लक्ष गेलं एका जराजर्जर कुत्रीकडे. तिच्या शरीराला कंप सुटला होता. पार्थ विरघळला. तिच्या जवळ जाऊन निरखून पाहिलं. तिला थोपटलं. मला घरी फोन केला. घरून डॉगफूड आणि पाणी मागवलं. ॲनिमल वेल्फेअर सोसायटीमधल्या काही ओळखीच्या लोकांना फोन केले. एक प्राण्यांचा डॉक्टर ताबडतोब हजरही झाला. तिला तपासले. डोळ्यात मोतिबिंदू होता. खूप म्हातारी आणि अशक्त होती. कोणताही औषधोपचार झेपेल अशी तिची अवस्था राहिली नव्हती; असा निष्कर्ष निघाला. पुढे काही फार करण्यासारखे नव्हते. पण तिला तसेच सोडणेही जन्मतःच संवेदनशील असणाऱ्या पार्थला अवघड जात होते. दुसऱ्या दिवशीही ती डोळ्यांसमोरून जाईना. एव्हाना तिचं नामकरण झालं होतं. स्नोव्हाईट ! आम्ही तिला आता ‘स्नो’ म्हणू लागलो.
दुसऱ्या दिवशी स्वाभाविकच रात्रीच्या फेरीत पार्थ पुन्हा डॉगफूड घेऊन तिला भेटायला गेला. प्राण्यांना प्रेम चांगलंच समजतं. त्यादिवशीही स्नोने पार्थच्या हातून खाऊ आनंदाने खाल्ला. मग तिसरा दिवस , चौथा दिवस. आता हा नेमच होऊन गेला. रोज रात्रीचं जेवण झालं की चालली स्वारी डबा घेऊन पार्कात ! मी रोज डोपीसाठी (डोपी : माझ्या घरचा बीगल जातीचा कुत्रा) रात्रीचं जेवण घरी बनवते. डाळ-भाज्या-चिकन घालून केलेला मऊ खिमटीवजा भात. तो आता दोघांसाठी बनू लागला. पौष्टिक अन्न पोटात जाऊ लागल्याने हळूहळू तिची तब्येत सुधारू लागली होती. स्नोही आता रोज रात्री पार्थची वाट पाहू लागली. पार्थला पहाताच उसळी मारून आनंदाने त्याच्याकडे येऊ लागली. लाड करून घेऊ लागली. प्रेमाने त्याचे हात चाटू लागली. त्याच्या पायाला अंग घासू लागली. स्वतःचे अंग खाजवून घेऊ लागली. खाजवताना हात थांबताच ढुशी देऊन त्याला ती आठवण करून देत असे. आणि तिची ही गम्मत पहाण्यासाठी पार्थ मुद्दाम मधूनच हात थांबवत असे. दोघांचा एकमेकांवर खूप जीव जडला. आणि रात्रफेरीचा नेम एक दिवसही चुकला नाही. कोणत्याही भाषेविना जन्मलेली ही मैत्री दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होत गेली!
ह्या स्नेहबंधात मी आणि ऋषी (माझा धाकटा मुलगा) ओढले गेलो नसतो तरच नवल! अधुनमधून आम्हीही पार्थबरोबर जाऊ लागलो. मी फारवेळा जात नसे पण ज्यादिवशी पार्थ नसेल त्यादिवशीची जबाबदारी ऋषीवर येऊ लागली. आणि ऋषीदेखील ती जबाबदारी न मानता खूप प्रेमाने जाऊ लागला. आता स्नोचे काही मित्र-मैत्रिणीसुद्धा तिच्या खाऊत हिस्सा मागायला येऊ लागले. पार्थ, ऋषी, स्नो आणि तिचं मित्रमंडळ अशी अंगतपंगत रोज पार्कातल्या उद्यान गणेश जवळ बसू लागली. काही महिने गेले. बारावीची परीक्षा झाली. त्यानंतरच्या सर्व प्रवेश परीक्षा झाल्या. या कशानेही रात्रफेरीत बाध आली नाही. स्नो खूष होती.
पार्थची ॲड्मिशन झाली. दिल्ली ! पुढची ५ वर्ष! ३० ऑगस्टला कॅम्पसवर हजर व्हायचं होतं. अदल्या रात्री अपेक्षेप्रमाणे शिवाजी पार्कात सर्व मित्रमंडळींचा निरोप घ्यायला गेला. आज मेन्यू वेगळा होता. विविध डॉग-ट्रीट्स आणि आईस्क्रीम. मंडळी खूष ! त्यांना कुठे माहीत होतं आपला मित्र उद्यापासून येणार नाहीये. पार्थच्या मनःस्थितीची कल्पना आम्हाला सगळ्यांनाच आली होती. नव्हती आली ती फक्त स्नोला.
पार्थच्या गैरहजेरीत त्याचा वसा पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी ऋषीने न सांगताच स्वीकारली. स्नो आणि मित्रमंडळाला हक्काचा नवा भिडू मिळाला. शाळा, अभ्यास, क्लासेस ह्या दिवसभराच्या थकवणाऱ्या रहाटगाडग्यात एकही दिवस स्नोचा विसर पडला नाही. की आजारपण आड आले नाही. एक दिवस तर अंगात साडेशंभर ताप असताना आणि मी परोपरीने त्याला जाण्यापासून परावृत्त करत असतानाही तो ‘स्नो वाट बघेल’ म्हणून लगबगीने निघून गेलाच. जितकी निष्पाप मुलं तितकीच निरागस स्नो. कुठून जुळले हे ऋणानुबंध ?! पार्थ २ दिवसाच्या सुट्टीवर घरी आला की आधी पार्कात धाव घेत असे. ऋषीचा नेम चालूच होता. आता स्नो शिवाय त्यालाही चैन पडत नव्हते. बराच काळ लोटला.
१ वर्ष २ महिने हा सेवायज्ञ अखंडपणे चालू होता. पण स्नो आता थकली होती. पडून रहात असे. पूर्वीसारखी ती आता उसळी मारून ऋषीकडे येत नसे. तिचा खाऊ समोर ठेवल्यावर उदासीनपणे त्याकडे पहात राही. उठून खाण्याचं त्राण तिच्यात आताशा राहिलं नव्हतं. दृष्टीही खूपच अधू झाली होती. प्रेमाची मात्र खूप भुकेली असे. पार्थ आणि ऋषीने मायेनं अंगावरून हात फिरवताच अंग घासून त्यांना प्रतिसाद देत असे.
११ एप्रिल २०१९ ! ऋषी रोजच्याप्रमाणे रात्रीच्या जेवणानंतर स्नोकडे गेला. रोज त्याची आतुरतेने वाट पहाणारी स्नो आज त्याच्या दृष्टीस पडेना! मनात शंकेची पाल चुकचुकली. आजुबाजूला चौकशी केली. त्या मंदिरात नेहमी येणाऱ्या एका वृद्ध गृहस्थाने सांगितले, “बाळा, एक मुलगी तिला गांधी हॉस्पिटलमधे ॲड्मिट करायला घेऊन गेली आहे.” १ वर्ष २ महिने ६ दिवसांनंतर आज पहिलाच दिवस ज्या दिवशी स्नो भेटली नाही. दोन्ही मुलांची मनोवस्था काय होणार याची मला पूर्ण कल्पना होती. त्यांना समजावण्याचा निष्फळ प्रयत्न करत राहिले. पार्थला फोनवर आणि ऋषीला घरी.
प्रताप नेमका त्याच रात्री टूरवरून परत आला. मुलांच्या व्यथेने व्यथित झाला नाही तो बाप कुठला ? आजपर्यंत प्रताप स्नो-कथेत नाममात्र पण प्रामाणिक भूमिका बजावत आला होता. ज्या दिवशी दोन्ही मुलांना जाणे शक्य नव्हते त्यादिवशी तो विनातक्रारच नव्हे तर स्वेच्छेने जात असे. प्रवासाचा शीण, थकवा सारं विसरून तो सकाळीच गांधी हॉस्पिटलकडे रवाना झाला. सोबत मीही... अर्धांगिनी!
गांधी हॉस्पिटल फार दूर नव्हते पण त्याच्या इतक्या मोठ्या परिसरात आणि ‘कोणत्यातरी मुलीने ॲड्मिट केले’ ह्या तुटपुंज्या माहितीच्या आधारे स्नोला तिथे शोधणे कठीण होते. तरीही स्नोचे वर्णन करत, प्रश्न विचारत विचारत तिथले कुत्र्यांचे सगळे वॉर्ड्स आम्ही पालथे घातले. इथे ॲड्मिट होणारे ८०% कुत्रे हे स्ट्रे डॉग्ज असतात. त्यांच्यावर विनामूल्य उपचार होतात. प्रत्येक कुत्र्यासाठी एक साधारण ४’*३’ चा स्वतंत्र सेल आहे. व्यवस्था चांगली आहे. कर्मचारीवर्गही चांगला वाटला. त्यांच्यातला एकजण आम्हाला घेऊन सगळे वॉर्ड्स फिरला. शेवटच्या वॉर्डमधे पोहोचलो आणि ...
समोरचं दृश्य पाहून डोळ्याच्या कडा नकळत ओलावल्या. साधारण विशीतली एक मुलगी, चांगल्या सुखवस्तू घरातली दिसणारी, तिथल्या एका सेलमधे स्नोला जवळ घेऊन बसली होती. खूप मायेनी तिच्या अंगावरून हात फिरवत होती. स्नोला सलाईन लावले होते. व सलाईन लावलेला पाय हलू नये म्हणून तिने तो अलगद धरून ठेवला होता. तिच्याशी बोलण्यावर कळले की अदल्या रात्री स्नो अत्यवस्थ झाली म्हणून ती तिला हॉस्पिटलमधे घेऊन गेली होती. स्नो सापडली आणि सोबत एक समविचारी, संवेदनशील मैत्रीणही.. प्राची !
आम्हाला बघून स्नो उठण्यासाठी धडपड करू लागली. पण तेवढं बळ नव्हतं आता पायात. मी तिला थोपटून परत झोपवलं. प्राचीने तिचे मेडिकल रिपोर्ट्स मला दाखवले. डॉ. कौस्तुभ नावाचा एक भला माणूस तिच्यावर उपचार करत होता. त्यांच्या सांगण्यानुसार लिव्हर आणि किडणी फेल झाले होते. इन्फेक्शन होतं. स्नो वाचण्याची शक्यता शून्य होती.
आता प्राची आणि मी रोज स्नोला भेटायला जाऊ लागलो. औषधोपचार चालू होते. प्राची आम्हा सर्वांच्या एक पाऊल पुढे होती. संध्याकाळपर्यंत ती स्नोचा सलाईनचा पाय धरून बसत असे. तिथेच त्या वॉर्डमधे. आजुबाजूला इतर अनेक कुत्रे आणि फक्त कुत्रेच. त्यांचे भुंकण्याचे आवाज. बस्स ! माणसं कोणी नाही ! हे सोपं नव्हतं ! प्रेमाच्या, माणुसकीच्या, सहानुभूतीच्या साऱ्या सीमा पार केल्या होत्या पोरीने.
आमचे सतत फोन चालू होते. तिने तिच्या गैरहजेरीत स्नोजवळ बसण्यासाठी पदरचे पैसे खर्च करून एक अटेण्डण्ट ठेवला. प्रतापही डॉक्टरांशी आणि वॉर्डबॉयशी बोलून स्नोच्या औषधोपचारात जातीने लक्ष घालत होता. प्राचीचा रोज माहीम-परेल दौरा चालूच होता. २-३ दिवस वाट पहायची आणि मग स्नोला तिची जीवनयात्रा संपवायला बाह्य मदत द्यायची असं डॉ. कौस्तुभ यांनी सांगितलं. पण ती वेळ आली नाही. १५ एप्रिल. सकाळीच प्राचीचा फोन आला, ‘स्नो गेली’. रात्रफेरी बंद झाली. अंगतपंगत थांबली.
हळव्या मनाने पण अपेक्षित घटना सर्वांनीच स्वीकारली. आज जगात जिथे माणूस माणसाला विचारत नाही; मुलं म्हाताऱ्या आईबापांना विचारत नाहीत; श्रीमंत गरिबाला विचारत नाही; देश, धर्म, वर्ण, प्रांत, जातीच्या भेदांवर युद्ध पेटतात; प्रेम, माणुसकी, सहानुभूती हे केवळ शब्द उरले आणि नफरत मने व्यापून राहिली; तिथे ह्या एका सामान्य गोष्टीचं काय मोल !?
आरती मांजरेकर
१५ एप्रिल २०१९
Well done 👍🏻👍🏻👌🏻
Very well written. I
प्रज्ञा, एक कथाचित्रच कागदावर चितारलंस गं ! खूप छान ओघवती शैली आहे तुझ्या लिखाणाची. खूपखूप लिहीत रहा.