रीत जगाची ही न्यारी...
- Aarti Manjarekar
- Jul 8, 2021
- 1 min read
Updated: Mar 1
रीत जगाची ही न्यारी
सारे दिखाव्याचे कर्म
आधी मिरवीती डौल
तेव्हा होई दानधर्म ॥१॥
रीत जगाची ही न्यारी
मृगजळाच्या मागुती
द्रव्यलोभाच्या नादात
विसरली नातीगोती ॥२॥
रीत जगाची ही न्यारी
रिता घडा वाजे फार
जाणत्याने बोलावे तो
भीड संकोच अपार ॥३॥
रीत जगाची ही न्यारी
मुखी सदा हरिनाम
जीव गांजले भवती
परी कोरडे नयन ॥४॥
रीत जगाची ही न्यारी
प्रेमपाश घटकेचा
झाला आताशा विरळा
बंध निश्चल प्रीतीचा ॥५॥
रीत जगाची ही न्यारी
जनमन देवभोळे
व्रतवैकल्ये कोरडी
कधी उघडावे डोळे ॥६॥
रीत जगाची ही न्यारी
ओढ आभासी जगाची
आला अंगणी वसंत
आस कागदी फुलांची ॥७॥
रीत जगाची ही न्यारी
वाटे नयेच जाणावी
शुद्ध संवेदना मात्र
मनी मानसी उरावी ॥८॥
आरती मांजरेकर
८ जुलै २०२१

सगळीकडे मुखवटेच वावरताना दिसतात. आतला 'माणूस' कोणी गायब केलाय काही कळेनासं झालंय. याचं अगदी यथार्थ वर्णन केलं आहेस.
Mast...perfecto...attachya jagache varnan.. Sundar kavita..keep it up
beautiful, Aarti. keep writing!
Lovely !!! Deep and thought provoking