महासागरी मासोळी तू …
- Aarti Manjarekar
- Feb 12, 2022
- 1 min read
कुणी निर्मिली विशाल सृष्टी
वैविध्याने नटलेली?
रूप रंग अन् सुगंध आणिक
मधुर ध्वनीने सजलेली
अंगांगी रोमांच फुलवते
नीरव मोहक वनस्थली
कुठे अचेतन कधी सचेतन
भासे निर्जल मरुस्थली
युगे युगे ती पुढे चालली
अगम्य धरिला ध्यास मनी
गूढ तियेचे उमजत नाही
कितीक शतके मनोमनी
आकाशगंगा नि धूमकेतु,
अशनि आणिक ग्रह तारे
कधी निपजले कुठे चालले
कशास्तव अन् हे सारे?
अथांग सागर अनंत अंबर
नसे पृथेची ठावे मिती
त्या पृथ्वीवर जगून जाती
नानाविध अन् जीव किती
त्या सर्वांना स्पर्श कराया
सहस्रकर हा अवतरतो
रोज नव्याने अन नेमाने
अविरत क्रम हा आचरतो
अशा चिरंतन चैतन्याचा
नश्वर कण तू इवलासा
मर्त्य मानवा बडिवार का
फुका मिरविशी उरी असा
थिटा तुझा रे यत्न पडे ह्या
विश्वाचे ऋत समजाया
तव हाती बस् असे तितिक्षा
आणि परिश्रम करावया
वृथा कैफ अन् अहंकार तव
त्यजूनी धरी अनुकंपेला
नको वाद वांझोटा पोकळ
धरशी उरी तू प्रीतीला
अल्प जीवनावधीत कुठला
समय उरे विद्वेषाला ?
कुणी न जाणे कधी लागते
पाऊल दुसऱ्या काठाला
विश्वाचे या भ्रमण अनाहत
अल्प तुझे वास्तव्य जरी
तुझ्याहीसाठी असती येथे
क्षण हक्काचे खरोखरी
विरून जावो वैरभाव अन्
विहार तव विश्रब्ध असो
‘महासागरी मासोळी’ परी
सत्य चिरंतन मनी वसो
आरती मांजरेकर
११ फेब्रुवारी २०२२

Kiti sundar……loved it