पृथ्वी
- Aarti Manjarekar
- Sep 9, 2023
- 1 min read
Updated: Sep 10, 2023
असे तप्त लावा तुझ्या अंतरंगी
तयाचा न लवलेशही बाह्यरूपी
देखोनी काया ही तुझी हिरवळली
शालूच हिरवा, म्हणे विश्व, ल्याली ॥१॥
सोशीत जाशी धग हृदयांतरीची
प्रसन्न वदना तू परी चीरस्थायी
उधळीत जाशी तू दोन्ही करांनी
माणिक-मोती, धरे, सस्यशाली ॥२॥
तुझ्या गर्भक्षितिजावरी फाकली
उषःकाली गे आस ही मेदिनी
भ्रमण तुझे निस्वार्थ अनाहत
कुणासाठी अन् चालले कुम्भिनी ॥३॥
गुण गंधरूप अन् तव चुंबकत्व
कृपाळे तयाचे तुला काय मोल
नेणसी धरित्री तू जनामनाला
रमलखुणांनी दिला काय कौल ॥४॥
जित्याचा भूमिभार तू साहसी
अस्तित्वापरता अन् तुझाच थारा
फलार्था नच केली अपेक्षा कधी तू
अवनी कर्मयोग जाणसी तू खरा॥५॥
बाह्यांतरी ते तुझे तोलणे, घाव
कृतघ्नपणाचे अन् उरी झेलणे
कसे साधते माय वसुंधरे तुज
भार दूषणांचा लीलया पेलणे ॥६॥
विस्फोट होता परी भावनांचा
ज्वालामुखी लोक म्हणती आपत्ति
उद्रेक करण्या नसे हक्क तुजला
तुझी शांतवृत्तीच आम्हा भावली ॥७॥
आरती मांजरेकर
९ सप्टेंबर २०२३

Khup ch mast 👌👌
अप्रतिम सुरेख 👌👌👌