तोच चंद्रमा नभात...
- Aarti Manjarekar
- Jun 6, 2021
- 4 min read
Updated: Mar 1
नवव्या शतकात होऊन गेलेल्या काही विद्वान संस्कृत कवयित्रींपैकी एक, शीला भट्टारिका. यांची चाळीस पेक्षा अधिकउत्त्तमोत्तम काव्ये प्रसिद्ध झाली. मध्ययुगीन संस्कृत टीकाकारांकडून त्यांच्या पांचाली शैलीतील काव्याची पुष्कळ प्रशंसाकेली गेली. सूक्तीमुक्तावलीत त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख असणारा हा श्लोक सापडतो.
शब्दार्थयो: समो गुम्फ: पाञ्चालीरीतिरिष्यते।
शीला भट्टारिकावाचि वाणोक्तिषु च सा यदि॥
आज त्यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसली तरी एका मत प्रवाहानुसार भट्टारिका ही उपाधी लक्षात घेता आठव्याशतकातील राष्ट्रकूट राजा ध्रूव याची राणी, शीला महादेवी हीच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि सदाज्ञानाची कास धरणाऱ्या या राणीने अनेक विद्वानांना गौरविले होते. दुर्दैवाने आज त्यांची अगदी काहीच काव्यं आपणाससंस्कृत काव्यसंग्रहांत उपलब्ध असलेली पहावयास मिळतात. आचार्य मम्मटांच्या काव्यप्रकाशात सापडणारं हे त्यापैकीचएक नितांत सुंदर काव्य !
य: कौमारहर: स एव हि वरस्ता एव चैत्रक्षपा- स्ते चोन्मीलितमालतीसुरभय: प्रौढा: कदम्बानिला:। सा चैवास्मि तथापि तत्र सुरतव्यापारलीलाविधौ रेवारोधसि वेतसीतरुतले चेत: समुत्कण्ठते ।।
ह्याचा अर्थ असा : माझं कौमार्यहरण करणारा माझा प्रियकर (माझा वर) तोच आहे. तीच चैत्राची रात्र आहे. कदंबवृक्षावरून वाहत येणारे आणि मालतीपुष्पाच्या सुगंधाने युक्त असे वारे तेच आहेत. मी ही तीच आहे. रेवा नदीच्याप्रवाहातील बांबूचे हे बेटही तेच आहे. आमची रती क्रीडाही तीच आहे. पण तरीही मनाला एक प्रकारची हुरहूर लागूनराहिली आहे. सारं काही तेच असलं तरी काहीतरी हरवलं आहे.
एका प्रेयसीच्या मनातील नाजूक भावना व्यक्त करणारा हा श्लोक ! एखादा लहानसा कण एका शिंपल्यात जाऊनविसावावा तसा हा श्लोक एका विद्वान कवयित्रीच्या मनात घर करून बसला. आणि तिथे त्या वलंयाकित प्रतिभेच्याआवरणातून (‘mother of pearl’ फार सुंदर शब्द आहे) नैसर्गिकरीत्या एक मोती निर्माण झाला. हा मोती म्हणजे हेसदाहरित भावगीत :
तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी
एकांती मज समीप तीच तूही कामिनी॥
नीरवता ती तशीच धूंद तेच चांदणे
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच तीच गंध मोहिनी
एकांती मज समीप तीच तूही कामिनी॥
सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे ?
मीही तोच तीच तूही प्रीती आज ती कुठे
ती न आर्तता सुरात स्वप्न ते न लोचनी
एकांती मज समीप तीच तूही कामिनी॥
त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून भंगल्या सुरातूनी
एकांती मज समीप तीच तूही कामिनी॥
हे काव्य वाचताना कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला जाणवेल की यात वर्णिलेली ही भावना ही काही मानवालाअपरिचित नाही... आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर अनुभवास येणारी. जी सत्य स्वीकारण्याखेरीज इतर कोणता पर्यायनसतो असं हे एक सत्य. पण हाच तर फरक असतो जनसामान्यांत आणि शांता शेळकेंसारख्या असामान्य व्यक्तीमधे ! प्रणय भावना किती आर्ततेने व्यक्त केली आहे आणि तरीही किती मर्यादशील शब्दांत !! किती संयत, किती शालीनआविष्कार भावनेचा !!
आशयानुसारी शब्दयोजनेचे हे एक सुरेख उदाहरण पहा.. एखाद्या गीतातील शब्दयोजना ह्यापेक्षा अधिक सुंदर आणिसमर्पक होऊच शकत नाही. स्त्री साठी मराठीत इतर अनेक शब्द असताना त्यांनी ‘कामिनी’ हा शब्दच योजावा. गाण्याच्यामध्यवर्ती कल्पनेशी सुसंगत ! आणि साक्षात सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या शांताबाईंना हे सारं कसं सहजनैसर्गिकरीत्या सुचतं. प्रासादिक शब्दकळा, गेयता ही तर त्यांची बलस्थाने!
गाण्याच्या शेवटच्या दोन ओळी ऐकताना तर अंगावर रोमांच उभे रहातात ; मनात कालवाकालव होते..
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून भंगल्या सुरातूनी
काय सांगणार या ओळींचा अर्थ ?! कशा व्यक्त करणार या भावना शब्दांत ?! हे फक्त शांताबाईच करू जाणो..
अर्थात बाबुजींचा सूर आणि स्वर यांचा परिसस्पर्श ह्या गीताला अधिकच विलोभनीय करून गेला आहे.
शांताबाईंबद्दल लिहावं तितकं कमीच आहे..
त्यांचं बालपण गेलं पुण्याजवळच्या खेड (आताचं राजगुरूनगर) येथे. जात्यावरच्या ओव्या, वासुदेवाची गीतं, लग्नाचीगाणी, सणांची लयबद्ध गाणी हे सारं ऐकत त्या मोठ्या झाल्या. लोकगीतांचे संस्कार अगदी लहान वयातच मनावर ठसले. शाळकरी वयात ज्ञानेश्वर, श्रीधर, मोरोपंत तसेच कृष्णाबाई गाडगीळ, परशुरामतात्या गोडबोले यांच्यापासून ते आधुनिककवींमधे बा..भ.बोरकर, बालकवी, भा..रा..तांबे, माधव ज्युलियन, ना.घ.देशपाडे, यशवंत यांसारख्या अनेक प्रतिभावंताचआपल्यावर पुष्कळ प्रभाव पडल्याचे त्या सांगतात. आणि तरीही कोणाचेही अनुकरण त्यांच्या कवितेत नाही. स्वत:चीओळख स्वत: चा चेहरा असलेली त्यांची कविता ही म्हणूनच मनाचा ठाव घेणारी असते. मराठी बरोबरच संस्कृतवरहीतेवढेच प्रभुत्व असणाऱ्या शांताबाईंना कित्येक गीते, कविता व संस्कृत श्लोक मुखोद्गत असतील याची गणनाच नाही. अफाट व्यासंग आणि उपजत प्रतिभा असा दुग्धशर्करा योग जुळून आल्यावर मग जे व्हायचे तेच झाले. आपल्यामायमराठीला अगणित भावस्पर्शी आणि उत्कट गीते, बालगीते, आत्मनिष्ठ कविता तसेच चित्रपट गीते यांचा भव्यनजराणाच सादर झाला जणू! जेवढे म्हणून मराठीत नावाजलेले संगीतकार आहेत; अगदी सुधीर फडके, वसंत पवार, वसंत प्रभू, दत्ता डावजेकर, यशवंत देव, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर, राम कदम, अशोक पत्की आणि इतर अनेकया साऱ्यांच्या संगीताचा स्पर्श झाला त्यांच्या गीतांना. शांताबईंच्या गाण्यांचा विषय आणि केवळ एकाच गीताबद्दलबोलायचं म्हणजे समुद्रात डुबकी मारून एकच शिंपली घेऊन यायचं ! पण त्यांच्या कार्याचा आवाकाच एवढा मोठा आहेकी त्यास गवसणी घालणं हे माझ्यासारख्या पामराचं काम नाही. तरीही पुसटशी आठवण, माझ्या अनेक आवडत्याकवितांपैकी ह्या काही कवितांची !
किलबील किलबील पक्षी बोलती
असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे
ही वाट दूर जाते
कळ्यांचे दिवस फुलांच्या राती
हिरवी झाडे पिवळा डोंगर (पाकोळी)
मेघ दाटले कोठून नकळे मनभर आल्या धारा
मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले
अजब सोहळा.... माती भिडली आभाळा
अपर्णा तप करिते काननी (चित्रपट गीत)
कविताप्रेमींनी जरूर वाचा !
पदवी आणि पदव्यूत्तर परीक्षांमधे त्यांनी मिळवलेली सुवर्ण पदके, आळंदी येथील साहित्य सम्मेलनाचे त्यांनी भूषवलेलेअध्यक्षपद आणि आयुष्यात मिळालेले असंख्य पुरस्कार हे शांताबाईना प्रदान केले गेल्यामुळे ते पुरस्कारच गौरविले गेलेअसे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही..
शांताबाईंचा सर्वात प्रिय साहित्यप्रकार हा कविता लेखन असला(असेन मी नसेन मी, वर्ष, रूपसी ,जन्मा जान्हवी, गोंदण हेकविता संग्रह) तरी त्यांनी इतर साहित्य प्रकारातही अगदी मुक्त स्वच्छंद विहार केला आहे.. त्यांनी हिंदी, इंग्रजी, संस्कृतभाषेतील पुष्कळ साहित्याचं अत्यंत ओघवत्या शैलीत भाषांतर केलं आहे.. त्यांचे कित्येक उत्तम कथासंग्रह(गुलमोहर,कावेरी,बासरी इत्यादी)आणि कादंबऱ्या (ओढ, धर्म) प्रसिद्ध आहेत..याशिवाय त्यांच्या, पावसा आधीचा पाऊस , आनंदाचं झाड, वडीलधारी माणसं ह्या ललीत लेखन संग्रहांना देखील वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.. तसेचत्यांनी कित्येक इंग्रजी कथा व कादंबऱ्यांची मराठीत भाषांतरे केली आहेत. शांताबाई इंग्रजी चित्रपटांवर आधारितस्तंभलेखनही करत असत.. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात स्पृहणीय पैलू म्हणजे यशाच्या आणि लोकप्रियतेच्यापरमोच्च शिखरावर पोहोचल्यानंतरही त्याच्या अत्यंत साध्या रहाणीत कधीही जराही फरक झाला नाही.. तहानभूकविसरून तासनतास निसर्गाच्या सहवासात व्यतीत करणाऱ्या शांताबाई नेहमी तशाच राहिल्या ,अथांग आणि प्रगल्भ! त्याच्या स्वभावातील ऋजुता , अदंभित्व जणू आपल्याला त्यांच्याच शब्दांत सांगत रहाते
कुणास काय ठाउके कसे कुठे उद्या असू?
निळ्या नभात रेखिली नकोस भावना पुसू
तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे
असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे
आज ६जून, या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा स्मृतीदिन ! त्या निमित्ताने ही लहानशी आदरांजली !!
आरती मांजरेकर
६ जून २०२१

Sunder, khub chan bhasha cha prayog
वाह अप्रतिम् .....
Khupach Sundar lihil ahe
Koop