top of page
Search

चारोळी

  • Writer: Aarti Manjarekar
    Aarti Manjarekar
  • Nov 3, 2022
  • 1 min read

Updated: Nov 16, 2022

#

म्हणे जन्म आणि मृत्यू

माणसाच्या हातात नसतं

हा भ्रम नाही तर काय?

जणू मधलं अंतर असतं !!


#

आयुष्यच क्षणभंगुर

तिथे सुख कसं चिरंतन मिळावं

पण म्हणून का चितेवर जळण्या-

आधीच चिंतेत जळावं?


#

एकवेळ बाजी विस्कटली

तर डाव का उधळायचा

हुकलेला डाव देवाचा,

पुढचा निगुतीनं  खेळायचा


#

नियतीने सोडलेल्या

रिकाम्या जागा भरत रहायचं

मन सुखाच्या शिंतोड्यांमधे

अगदी चिंब भिजवायचं


#

आपल्यापाशी असलेले आयुष्य

जिवापाड जपायचे

पण विश्वस्ताने

अनामत ठेवीत मन नाही गुंतवायचे


#

दानयज्ञ संपन्न झाला

कोशागारच नव्हे मनही रिते झाले

भरली होती तरीही ओंजळ

पीडितांच्या आशीर्वादांनी…


#

प्रत्येक कुरूप बदकाने

राजहंसच का असायला हवं

बहुतेक त्याला आहे तसं स्वीकारणं

‘शहाण्यांना’ जमत नसावं


#

वेदनेने तडफडणारं पोटचं पोर पाहून

त्या दगडाला पाझर फुटत नव्हतां.

कुणा कुडमुड्याच्या सांगण्यावरून ग्रहशांती करून

तो नुकताच ‘कृतकृत्य’ झाला होतां.


#

पार्थिव जळून कधीचं राख झालं होतं

पण अजूनही …

भावना, इच्छा, आकांक्षांचं कलेवर

चार खांद्यांची वाट पहात होतं.


#

‘आताशा कसलेच स्मरण रहात नाही’

म्हातारी खेदाने म्हणाली.

मला तिचा हेवा वाटला.

तिला विस्मरणाचे वरदान मिळाले होते.




आरती मांजरेकर

३ नोव्हेंबर २०२२


 
 
 

1 comentário


Bhairavi Anand
Bhairavi Anand
03 de nov. de 2022

Superb......khup ch

Curtir
Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn

©2021 by रत्नप्रभा. Proudly created with Wix.com

bottom of page