गदिमा, कालिदास आणि शकुंतला !!!
- Aarti Manjarekar
- Oct 4, 2021
- 4 min read
Updated: Mar 1
गदिमा, बोरकर, शांताबाई शेळके आणि यांच्यासारखेच मराठी साहित्यविश्वातील इतर अनेक दिग्गज यांचे एकव्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्यांचा संस्कृत मधील व्यासंग. ह्या गोष्टीचा नुकताच पुन्हा एकदा प्रत्यय आला. सध्याच्यासंस्कृत विश्वातील विदुषी आणि माझ्या सौभाग्याने माझ्या गुरू असणाऱ्या डॉ. गौरी माहुलीकर यांचे एक व्याख्यानअलिकडेच ऐकले. त्यांनी गदिमांचे एक अतिसुंदर गीत उद्धृत केले.
सासुर्यास चालली लाडकी शकुंतला
चालतो तिच्यासवे, तिच्यात जीव गुंतला ॥
ढाळतात आसवे मोर-हरिणशावके
मूक आज जाहले सर्व पक्षी बोलके
यापुढे सखी नुरे, माधवी-लते तुला ॥
पान पान गाळुनी दुःख दाविती तरू
गर्भिणी मृगी कुणी वाट ये तिची धरू
दंती धरुन पल्लवा आडवी खुळी तिला ॥
भावमुक्त मी मुनी, मला न शोक आवरे
जन्मदांस सोसवे दुःख हे कसे बरे?
कन्यका न कनककोष मी धन्यास अर्पिला ॥
‘सुवासिनी’ चित्रपटासाठी सुधीर फडके यांनी हे गीत संगीतबद्ध करून गायले आहे. वास्तविक हे गीत , खरंतर गीताचामुखडाच फक्त, लहानपणी ऐकल्याचा आठवत होता. पण तेव्हा कालिदासाच्या शकुंतलेशी ओळख झाली नव्हती. आजजेव्हा बाईंनी शाकुंतलातील त्या सुंदर श्लोकांशी ह्या गीताचा असलेला संबंध नजरेस आणून दिला तेव्हा तो माझ्यासाठी‘युरेका क्षण’ होता.
शकुंतलेसह गांधर्व विवाह करून दुष्यंत माघारी परतला. इकडे तीर्थयात्रेवरून परतलेल्या कण्वमुनींना शकुंतला गर्भवतीअसल्याचे कळते. ते शकुंतलेला पतिगृही पाठवण्याची व्यवस्था करतात. सिध्दप्रज्ञ ऋषी कण्व यांची शकुंतला हीमानसकन्या ! तिला अनुरूप वर प्राप्त झाला म्हणून कण्वमुनींना पराकाष्ठेचा आनंद तर होतो.. ते कौतुकाने तिला उत्कृष्टवर देतात, आशीर्वाद देतात. परंतु प्राणापलिकडे प्रिय असलेली शकुंतला आज जाणार ह्या विचाराने ते मनातून व्यथितझाले आहेत. सर्व हयात अरण्यातील एकान्तवासात तपश्चर्या करण्यात घालवलेल्या या वृध्द ऋषींचे हृदय लेकीच्यावियोगाच्या कल्पनेने खिन्नतेने भारून गेले आहे.. त्यांची ही वेदना कालिदासाच्या कुशल लेखणीतून अगदी तंतोतंतसाकारली आहे!!
"यास्यत्यद्य शकुन्तलेति ह्रदयं संस्पृष्टमुत्कण्ठया
कण्ठःस्तम्भितबाष्पवृत्तिकलुषश्चिन्ताजडंदर्शनम्
वैक्लव्यं मम तावदीदृशमिदं स्नेहादरण्यौकस:
पीड्यन्ते गृहिण: कथं नु तनयाविश्लेषदु:खैर्नवैः
[श्लोकार्थ : आज शकुंतला जाणार ह्या कल्पनेने माझं हृदय दु:खाने व्याकुळ होऊन गेले आहे; अश्रु आतल्या आत दाबूनधरल्यामुळे माझा कंठ सद्गदित झाला आहे. माझ्यासारख्या अरण्यवासी माणसाला ममतेमुळे इतकं विलक्षण दु:ख होतआहे. मग पूर्वी कधी न अनुभवलेल्या, कन्येच्या विरहाच्या वेदनांमुळे गृहस्थाश्रमी माणसांना किती दु:ख होत असेल बरे !!]
गदिमा म्हणतात......
“भावमुक्त मी मुनी, मला न शोक आवरे
जन्मदांस सोसवे दुःख हे कसे बरे?
कन्यका न कनककोष मी धन्यास अर्पिला !”
कमितकमी शब्दात एका पित्याची मनोवस्था गदिमांच्या या आशयघन गीतातूनही किती भावपूर्ण रीतीने अभिव्यक्त झालीआहे!! ‘कन्या हे परक्याचं धन’. ही उक्ति आपल्या चांगलीच परिचयाची आहे. चौथा अंक संपवताना कालिदासाने एकसुरेख श्लोक घातला आहे :
अर्थो हि कन्या परकीय एव
तामद्य संप्रेष्य परिग्रहीतुः।
जातो ममायं विशदः प्रकामं
प्रत्यर्पितन्यास इवान्तरात्मा॥
[श्लोकार्थ : कन्या हे दुसऱ्याचेच धन आहे. आज तिला पतीकडे पाठविल्यामुळे एखाद्याची ठेव त्याला परत केल्यानंतरजसा आनंद व्हावा तसा माझ्या अंतरात्म्याला पराकाष्ठेचा आनंद झाला आहे.] ‘कनककोष’ या एका शब्दात पिता-पुत्रीचंनातं तर उंचीवर घेऊन गेलेतच ,गदिमा, पण पूर्ण श्लोकाचं सार एका ओळीत कसं सुरेख घातलंय या शब्दप्रभूने !! काव्याची आशयघनता कशी लीलया साधली आहे !!
कालिदासाबद्दल एक उक्ति खूप प्रसिद्ध आहे.
काव्येषु नाटकं रम्यं तत्रापि च शकुन्तला ।
तत्रापि च चतुर्थोङ्क: तत्र श्लोक चतुष्टयम् ॥
[श्लोकार्थ : काव्याचे जे सर्व प्रकार आहेत त्यात नाटक विशेष सुन्दर ! नाटकांमध्ये काव्य-सौन्दर्यदृष्ट्या ‘अभिज्ञानशाकुन्तलं’ सर्वश्रेष्ठ ! शाकुन्तलातही चतुर्थ अंक आणि चौथ्या अंकातीलही चार श्लोक सर्वाधिक रमणीय आहेत.]
त्या ‘श्लोक चतुष्टयम्’ पैकीच हे वर उध्दृत केलेले दोन श्लोक!
शकुंतला ही एक आश्रमकन्या. कण्वमुनींच्या आश्रमात, निसर्गाच्या सानिध्यात वाढलेली.. आश्रमातील वृक्ष वेली आणिप्राणी पक्षी हेच सारे तिचे सखे सोबती.. त्या वेलींना पाणी दिल्याशिवाय ती कधी पाणी पीत नसे. त्यांना इजा होऊ नयेम्हणून ती कधी त्यांची पाने फुले तोडत नाही.. या वल्लरी आता आपल्याला सखीचा विरह होणार या कल्पनेने दु:खीझाल्या आहेत.. या साऱ्यांशी तिचे जीवन एकरूप झाले आहे. या वृक्ष वेलींनी मोठ्या प्रेमाने तिला आभरणे व अलंकार देऊकेले.. एका वृक्षाने चंद्रधवल दुकूल दिले.. दुसऱ्याने लाक्षारस दिला.. गर्भवती मृगी मुखातील दर्भाचे घास खाली टाकून, शकुंतलेचा पदर दातात धरून तिला अडवू पहात आहे. पक्षी दु:खी झाले आहेत.. मोर नृत्य करत नाहीत.. वृक्ष वेली सारेसारे उदास आहेत.. गळून पडणारी पाने ही त्यांची आसवंच जणू. सारे तपोवनच खिन्न झाले आहे..
उद्गलितदर्भकवला मृग्य: परित्यक्तनर्तना मयूरा:।
अपसृतपाण्डुपत्रा मुञ्चन्त्यश्रूणीव लता:॥
[श्लोकार्थ : हरिणींनी दर्भाचे घास खाली टाकून दिले आहेत.. मोरांनी नृत्य थांबवले आहे.. आणि पांढुरकी पाने खालीटाकणाऱ्या वेली जणू काही आसवं ढाळीत आहेत.]
गदिमा म्हणतात......
ढाळतात आसवे मोर-हरिणशावके
मूक आज जाहले सर्व पक्षी बोलके
यापुढे सखी नुरे, माधवी-लते तुला ।
पान पान गाळुनी दुःख दाविती तरू
गर्भिणी मृगी कुणी वाट ये तिची धरू
दंती धरुन पल्लवा आडवी खुळी तिला ।
लहानग्या आईवेगळ्या हरिणशावकावर तिचे पुत्रवत् प्रेम! हे हरिणशावक आज तिला आश्रम सोडून जाताना पाहून अश्रुढाळीत आहे.. एखाद्या मुलाचे सांत्वन करावे तसे ती आईच्या ममतेने त्याचे सांत्वन करते.
यस्य त्वया व्रणविरोपणमिङ्गुदीनां
तैलं न्यषिच्यत मुखे कुशसूचिविद्धे
श्यामाकमुष्टिपरिवर्धितको जहाति
सोयं न पुत्रकृतक: पदवीं मृगस्ते॥
[श्लोकार्थ : दर्भाचं टोक रुतलं असता ती जखम बरी करण्यासाठी ज्याच्या तोंडाला तू इंगुदीचं तेल लावलंस, तो हा मूठमूठश्यामाक चारून लहानाचा मोठा केलेला आणि तुला मुलाप्रमाणे असलेला मृग तुझी वाट सोडीत नाही]
मायलेकांमधील निर्व्याज, तरल प्रेमभाव पहा कसा टिपला आहे कालिदासाने! अलगद !
कालिदास हा निसर्गकवी !! कालिदासाच्या काव्यामधे नेहमीच निसर्गाला अविभाज्य स्थान राहिलं आहे. शाकुंतलातीलनिसर्ग सचेतन आहे.. मानवी भावनांनी युक्त आहे.. “सासरी जाणाऱ्या तुमच्या लाडक्या शकुंतलेला निरोप द्या” असे खूपजिव्हाळ्याने कण्वमुनी या साऱ्या वृक्षवेली आणि पशुपक्ष्यांना सांगतात. निसर्ग इथे केवळ पार्श्वभूमीला न रहाता तोकाव्यात कसा एकजीव होऊन जातो.. वृक्ष, वेली, प्राणी, पक्षी ही सारी, त्या काव्यातील पात्रच आहेत जणू. हे सारे वर्णनकरताना जशी कालिदासाची शब्दकळा साक्षात चैतन्यरूप धारण करते, तसेच मानवाचे आणि निसर्गाचे एकमेकांशीअसलेले हे उत्कट तादात्म्य गदिमांच्या कवितेतही, इतक्या सुंदर प्रकारे, इतक्या परिणामकारक रीतीने आविष्कृत झालेआहे.. अत्यंत वेचक, अर्थवाही, आशयघन, कलात्मक शब्दयोजना आणि तितकेच लयबध्द काव्य यांचा सुंदर मिलाफयामुळे हे काव्य अत्यंत हृदयस्पर्शी झाले आहे. या साऱ्यांची दु:खे गदिमांच्या सहृदय लेखणीत सामावून किती जिवंतपणेव्यक्त झाली आहेत.. जसा महाकवी कालिदास तसेच आपले महाकवी गदिमा! कालिदासाने अत्युच्च दर्जाचे साहित्यभारतवर्षाला दिले.. तर गदिमांच्या ‘गीतरामायण’ या एकमेवाद्वितीय निर्मितीने तर त्यांची ‘आधुनिक वाल्मिकी’ अशीओळख कायम केली.. पण खरेतर गदिमांच्या काव्यविश्वाचा परीघ फार फार मोठा आहे. त्यांनी शेकडो कविता आणिगाणी महाराष्ट्राला दिली.. शेकडो चित्रपटांना गीते दिली.. पुलं म्हणतात, “तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्यामेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतमळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे?” आणि इतकेचनव्हे तर सर्वत्र त्यांचे शब्द आणि छंद या दोहोंवरील प्रभुत्व जाणवल्याखेरीज रहात नाही. कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचेझाल्यास, “शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.” ग.दि.माडगूळकर स्वतः यवतमाळ येथील साहित्यसंमेलनातील भाषणात म्हणाले होते, “गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढूनकशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते. पण छंदात रचलेली एखादीकविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एखाद्या कविला काव्यस्फुरते तेच छंदासह....” गदिमांच्या बाबतीत खरेच आहे! हीच ती उपजत प्रतिभा ज्याने आपण वाचक मंत्रमुग्ध होऊनजातो!!
असे हे दोन सरस्वतीनंदन ज्यांनी अमूल्य साहित्य संपदा निर्माण करून तुम्हा आम्हा सर्वांचेच जीवन समृध्द करून टाकलेआहे.. या दोन्ही महाकवींना शतश: प्रणाम !
आणि गदिमांना आज त्यांच्या जन्मदिनी यथामती आदरांजली !!! 🌹🙏🏻🌹
आरती मांजरेकर
१ ऑक्टोबर २०२१

Khup chhan 😂👌🏻