top of page
Search

कुठल्याशा वळणावर …

  • Writer: Aarti Manjarekar
    Aarti Manjarekar
  • Jul 18, 2022
  • 1 min read

Updated: Mar 1


कुठल्याशा वळणावर भेटला होतास

‘पुढे सोबतीनेच जाऊ’ म्हणाला होतास

मीही आढेवेढे न घेता चालू लागले होते

मनात फुटलेल्या आनंदाच्या उकळ्या,

लालीमा पसरलेल्या चेहऱ्यामागे

उगाच लपवू पहात होते


पोहोचायचं कुठेच नव्हतं … दोघांनाही!

फक्त तिथं असायचं होतं…

शरीरानं आणि मनानंही !


वाटेवर फुलांचा सडा होता

तसेच काटेही कमी नव्हते

इंद्रधनुषी कमान होती तर

कडाडणाऱ्या विजाही होत्या


खाच-खळगे आले गेले, कळले सुद्धा नव्हते

उन्हातान्हात… पाऊल पोळले सुध्दा नव्हते

पावसाच्या दिवसात आणि अंधाऱ्या रात्रीही

कोणाचेच पाय मागे वळले सुद्धा नव्हते


मग असं कसं झालं… ?

स्वप्नामधून जागं झाल्यागत अचानक सगळं नाहीसं झालं !?

ते खरं होतं की हे खरं आहे हेच समजेनासं झालं.


आयुष्यानं आणलं अशा वाटेवर जिथे कोणाची साथ नाही, सोबत नाही!

त्या पूर्वीच्या पाऊलखुणांचा मागमूसही कुठे उरला नाही.


कुठे गेलं ते सारं ? ती वाट, ती फुलं, ते इंद्रधनू ते वळण ?

आणि आता इथे एकटी … एकाकी मी ! हे कुठलं अनोळखी वळण?


मी म्हणाले, “पुढली वाट किती भयाण आहे”

उत्तर आलं, ‘वाटा सगळ्या सारख्याच. सगळ्यांचे प्रवासही सारखेच. फरक फक्त फुलांच्या प्रकारात आणि काट्यांच्याआकारात !


ती सप्तरंगी कमान बाहेर नसतेच मुळी. आत असते … खोल मनात. चष्म्याच्या रंगीत काचेप्रमाणे आपलं काम करत असते. पण ती गेली आता… कायमचीच! तुझ्याबरोबर.


आता वास्तवाची जाणीव झाली. पुढची वाट दिसली उदास !भकास !! रखरखीत !!!

पण तीही कापेन मी शांतपणे, धीरानं! शेवटपर्यंत !

पुन्हा कुठल्याशा वळणावर भेटशील; ‘पुढे सोबतीनेच जाऊ’ म्हणशील; तोपर्यंत !!!


आरती मांजरेकर

         १८ जुलै २०२२




       



 
 
 

2件のコメント


Bhairavi Anand
Bhairavi Anand
2022年7月18日

Khup sunder 👌🏻👌🏻

いいね!

Sriveena D
Sriveena D
2022年7月18日

Sundar...👌👌

いいね!
Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn

©2021 by रत्नप्रभा. Proudly created with Wix.com

bottom of page